- शेख शब्बीरदेगलुर ( नांदेड) : उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या घराशेजारी असलेल्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या घराच्या खिडकीच्या लोखंडी सळ्या कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने शेवटी गणेश मूर्ती समोर ठेवलेल्या प्रसादरुपी सफरचंदावर ताव मारून रिकाम्या हातीच परतावे लागल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
शहरातील बिरादार गॅसच्या पाठीमागे असलेल्या विशाल नगर येथे देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे आपल्या कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास राहतात. 13 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे ते आपल्या कुटुंबीयासमवेत घरी झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आधुनिक कटरचा वापर करून घराच्या खिडकीच्या दोन ते तीन लोखंडी सळया कापून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या झोपलेल्या खोलीस बाहेरून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, चोरांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या चोरट्यांनी बैठक रूमकडे मोर्चा वळवला. येथे स्थापित गणेशमूर्तीची आरास तपासली तेथेही काही नव्हते, तेव्हा गणेशा पुढे ठेवलेल्या प्रसादरुपी सफरचंदावर चोरट्यांची नजर गेली. रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने अखेर चोरट्यांनी सफरचंदावर ताव मारून तेथून काढता पाय घेतला.
हा प्रकार 14 सप्टेंबर रोजी सकाळी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीसांना याची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी व पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलीसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. विशेष म्हणजे, मुख्याधिकारी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांचे निवासस्थान आहे. तर अगदी शंभर मीटरच्या अंतरावर माजी आमदार जितेश अंतापुरकर यांचे निवासस्थान आहे. तरीही सदरील घडलेली घटना पाहता चोरट्यांवर आता देगलूर पोलिसांची वचक राहिली नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून कोणताही मुद्देमाल चोरीस न गेल्याने गुन्हा दाखल झाला नाही अशी माहिती आहे.