नांदेड : एरव्ही बसस्थानक, रेल्वेस्टेशन व बाजारातील गर्दीच्या ठिकाणी हात की सफाई दाखवित भल्याभल्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या चोरट्यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे़ विविध पक्षांच्या होणाऱ्या सभांमध्ये गर्दीचा फायदा घेत खिसे कापण्यात येतात़ त्यासाठी चोरट्यांनी कोणत्या नेत्याच्या सभा कुठे अन् त्यासाठी जमणारी गर्दी किती? याचेही अंदाज बांधले आहेत़निवडणुका देशात उत्सव म्हणून साज-या केल्या जातात़ नेतेमंडळीसह पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साहही या काळात शिगेला पोहोचलेला असतो़ त्यात अनेक बेरोजगारांना या काळात काम मिळून चांगल्या कमाईची संधीही असते़ मार्केटमध्येही पैसा खेळता राहतो़ अशा परिस्थितीत या संधीचा लाभ चोरटे घेणार नसतील तर नवलच! मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांची श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर सभा होती़या सभेत जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले होते़ सभा संपल्यानंतर अनेकांच्या लक्षात ही बाब आली होती़ तसाच काहीसा प्रकार विधानसभेच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हदगाव दौºयावेळी आला होता़ या दौºयासाठी नांदेडातील चोरट्यांची टोळी विशेष वाहन करुन गेली होती़ त्यात आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे़ सध्या कॉर्नर बैठका घेण्यावर उमेदवारांचा भर आहे़ परंतु आगामी काळात सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा नांदेडात होणार आहेत़ त्यामुळे या सभांना हजारोंची गर्दी असणार आहे़या गर्दीचा फायदा घेण्यासाठी नांदेडातील चोरट्यांच्या टोळीने नियोजन सुरु केले आहे़ त्यामुळे लोकसभेच्या या रणधुमाळीत सभांना जाताना आपल्या खिश्यावर चोरट्याचा डल्ला पडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे़ तर चोरट्यांच्या या हालचालीवर पोलिसांचेही बारीक लक्ष असून साध्या वेषात गर्दीमध्ये पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत़
आतापर्यंत ६२६ शस्त्रे केली जमा
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना आपले शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ त्यात आतापर्यंत १ हजार १२ शस्त्रांपैकी ६२६ परवानधारकांनी आपली शस्त्रे जमा केली आहेत़ ही सर्व शस्त्रे आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आली़
- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी लागू झाली़ निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून परवानाधारकाकडील शस्त्रे जमा करण्यात येतात़
- जिल्ह्यात परवानधारकांकडे रिव्हाल्वर, पिस्टल, बाराबोअर, भरमार बंदूक, रायफल आदी शस्त्रांचा समावेश आहे़ ४३ परवानाधारकांनी मात्र परवाना काढल्यानंतरही शस्त्र खरेदी केले नाहीत़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या छाननी समितीने १७४ जणांना शस्त्र न जमा करण्याची सूट दिली आहे़
- यामध्ये बँक सरक्षण, संस्था, दंडाधिकाºयाचे अधिकार असलेल्या अधिकाºयासह ज्या व्यक्तीच्या जीवितास धोका आहे, अशा व्यक्तींचा समावेश आहे़ जिल्ह्यातील ३६ परवानाधारकांना तातडीने आपली शस्त्रे जमा करण्यासाठी छाननी समितीने नोटिसा बजावल्या होत्या़ यामध्ये जामिनावर बाहेर आलेले, गुन्हेगार प्रवृत्तीचे काही जण होते़ या सर्वांनी आपली शस्त्रे जमा केली आहेत़
एका टोळीत सहा ते सात खिसेकापूंचा समावेशनांदेड शहरातील बसस्थानक, रेल्वेस्टेशन, बाजारपेठा या ठिकाणी मोबाईल आणि पर्स लांबविणाºया अनेक टोळ्या सक्रिय आहेत़ त्यातील एका टोळीत सहा ते सात चोरट्यांचा समावेश असतो़ प्रत्येक टोळी आपआपली हद्द वाटून घेते़ एका टोळीतील सदस्याने दुसºया टोळीच्या हद्दीत जायचे नाही असा अलिखित नियमही तयार करण्यात आला आहे़