नांदेड- सध्या लग्नाचा हंगाम असून चोरट्यांनाही आयती संधी चालून आली आहे. सिडको भागातील कृष्णा इंडस्ट्रीज कोहीनूर मिलच्या पाठीमागे सुरु असलेल्या लग्न सोहळ्यात चोरट्याने दागिने अन् मोबाईल असा एकुण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १६ मे रोजी घडली. त्यामुळे वर्हाडी मंडळींनाही मोठा धक्का बसला.
एमआयडीसी भागातील मंगल कार्यालयात १६ मे रोजी एक विवाह सोहळा होता. त्यामुळे वर्हाडी मंडळी येथे मुक्कामाला होती. त्याचवेळी चोरटेही लग्न मंडपात शिरले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्याने सखाराम बाबाराव केंद्रे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, एक तोळ्याचे गंठण, त्यांच्या नातेवाईकांचे दोन मोबाईल असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पहाटे चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात सखाराम केंद्रे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.मांजरमकर हे करीत आहेत.