नांदेड : कोरोनाच्या संकटामुळे अनेक जण आहे त्या ठिकाणीच अडकून पडले होते; परंतु आता लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. शहरातील भाग्यनगर हद्दीतील एक महिला फेब्रुवारीत पुण्यात मुलाकडे गेल्यानंतर तिकडेच अडकून पडली होती. त्याचदरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडून ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. महिला पुण्याहून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
कैलासनगर येथील सेवानिवृत्त प्रभा विश्वनाथराव शौनक या फेब्रुवारी महिन्यात पुणे येथील मुलाकडे गेल्या होत्या. काही दिवस मुलाकडे राहून परत आपल्या गावी येण्याचा त्यांचा विचार होता; परंतु मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले अन् त्या पुणे येथेच अडकून पडल्या. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतरही त्यांनी काही काळ तेथेच राहणे पसंत केले. त्यानंतर २० नोव्हेंबरला त्या नांदेडला आल्या. यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला, तसेच सोन्या-चांदीचे ४६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते.
या प्रकरणात १ डिसेंबर रोजी त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. माळगे करीत आहेत. दरम्यान, दिवाळी सणात मुलीकडे जाणे एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. या कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी ४५ हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे घरातील काही रक्कम ते अगोदरच आपल्यासोबत घेऊन गेले होते. मारूती लक्ष्मण वाघमारे असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते दिवाळी सणाकरिता मुलीला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी घरातील काही रक्कम त्यांनी सोबत घेतली होती. तर उर्वरित रक्कम घरातील धान्य ठेवण्याच्या लोखंडी पेटीत ठेवली होती. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. यावेळी धान्याच्या कोठीतील ४५ हजार रुपये लंपास करण्यात आले. ३० नोव्हेंबर राेजी वाघमारे हे परत आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली.