जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. अनेक ठिकाणी जास्तीचे पैसे मोजूनही वाळू मिळत नसल्याने बांधकामाचे नियोजन लांबणीवर पडले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात वाळूमाफियांनी डोके वर काढले असून, मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे. जिल्ह्यात बिहारी, उत्तर प्रदेशातील टोळ्यांच्या मदतीने वाळू उपसा सुरू होता. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या परप्रांतीयाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला आहे. त्याचवेळी आता स्थानिक टोळ्याही तयार झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर सक्शन पंपाचा वापर वाळू उपशासाठी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या कारवाईत आतापर्यंत १० सक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत. तरीही कारवाई केलेल्या ठिकाणांवर पुन्हा अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. त्यामुळे वाळूमाफिया या कारवाईला किती प्रमाणात जुमानतात ते स्पष्ट होत आहे.
जिल्हा प्रशासनाला आता तिसऱ्या ई-लिलाव फेरीत हे घाट जाण्याची अपेक्षा असली तरीही लिलाव प्रक्रियेतील प्रतिब्रास वाळूचा दर पाहता ही अपेक्षा पूर्णत्वास न जाणारीच दिसत आहे. १७ फेब्रुवारी रोजी नेमके चित्र स्पष्ट होणार आहे; पण त्याचवेळी वाळूमाफियांना आवर घालणे हे जिल्हा प्रशासनासह तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनाही मोठे आव्हान ठरणार आहे.