बिलोली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात असलेली उष्णता एप्रिल महिन्यात जाणवू लागली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तीव्रतेने ४३ अंश सेल्सीअस पारा ओलांडला असून त्यामुळे जंगलातील व शेतातील पाणवठे आटले आहेत.जंगलात राहणाऱ्या पशु-पक्षी व विविध प्रकारच्या प्राण्याची भटकंती वाढली आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत. याकडे वनविभाग यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वृत लोकमतमध्ये प्रकाशित होताच बिलोली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी यांनी या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन बडूर, बामणी, मिणकीसह अनेक गावांत असलेल्या माळराणावरील पाणवठ्यात पाणी टाकून जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करुन सदर प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे जंगलातील पशु-प्राण्याला दिलासा मिळाला आहे.जंगलातील पशु-प्राण्यांना सांभाळणे पाणी उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या बाबतची आर्थिक तरतूद वन विभागाकडे प्रशासनाने केली आहे. याची जाणीव वनविभागात कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना आहे. त्यांना पाणी उपलब्ध करुन देणे वनविभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सर्वच पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी उपलब्ध केले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी व वनरक्षक गिरीश कुरुडे यांनी सांगितले आहे.बिलोली तालुक्यातील बडूर, बामणी, मिणकी, सगरोळी, कुंडलवाडी या गावांना वनक्षेत्र आहे. हरीण, काळवीट, वानर-माकड, मोर यासारखे अनेक वन्यजीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. वनविभागाने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्यामुळे प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.
टँकरद्वारे भागविली जाते वन्यजीवांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:25 IST
तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते.
टँकरद्वारे भागविली जाते वन्यजीवांची तहान
ठळक मुद्देबिलोली तालुक्यात बडूर, मिणकीत वनविभागाने तयार केली पाणवठे