नांदेड : आॅक्टोबरमध्येच मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील १,३४४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारीपर्यंत आणखी १,१६८ गावे तर एप्रिलमध्ये १,८७३ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भूजल आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समोर आली आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी १२ तालुक्यांत सरासरीच्या ० ते २० टक्क्यांहून कमी पाऊस झालेला आहे. २० ते ३० टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या १२ आहे. ३० ते ५० टक्क्यांहून कमी पर्जन्यमान झालेले तालुके ४० आहेत. ७ तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमीपाऊस झाला आहे. त्यात बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे.विभागातील ४ हजार ५७२ गावांतील भूजलपातळी १ मीटरपेक्षा अधिक घटली आहे, तर १ हजार ९४८ गावांतील भूजलपातळीत १ ते २ मीटरची घट झाली आहे. २ ते ३ मीटर घट झालेल्या गावांची संख्या१,२१३ आहे.विशेष म्हणजे तब्बल १,४११ गावांत भूजलपातळीत ३ मीटरहून अधिक घट झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. ६७ गावांमधील भूजलसाठा चिंताजनक स्तरावरआहे.>प्रशासनाकडून मराठवाड्याची कोंडी?प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी सुरू आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला रेखांकन मंजुरीसाठी २५०० कोटींच्या अनुदानाची गरज आहे. दुसरीकडे समन्यायी पाणी वाटपाचा अजून निर्णय झालेला नाही. कालवा दुरूस्ती, शेतापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था करणे, पाणी वापर संस्थांची हद्द ठरविण्यासाठी अनुदानाची गरज आहे.
मराठवाड्यातील १,३४४ गावे तहानलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 3:47 AM