नांदेड : परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पुरातन काळापासून गंगेची आरती केली जाते़ यानिमित्ताने मंगळवारी कार्तिकी पौर्णिमेला नांदेड येथील गोदावरीच्या नगीना घाटावर हजारो महिलांनी एकत्रित येवून गंगेची आरती केली़ तसेच नदीपात्रात हजारो दिवे सोडले़ हे नयन मनोहर दृश्य पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती़
अॅड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकाराने सलग पंधराव्या वर्षी या गंगा पूजन व गोदावरीच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते़ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संतोषगुरु परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली. उपस्थित हजारो महिलांना दिवे, द्रोण व फुलांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. सालासार भजन मंडळाचे गिरीराज लोया व व त्यांच्या सहका-यांनी पाच आरत्यांचे गायन केले. त्यानंतर महिलांनी आपल्या परिवारातील सदस्यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी नदीपात्रामध्ये दिवे सोडले हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीना घाट परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
उत्कृष्ट पूजेची थाळी सजवण्याचा स्पर्धेचे परीक्षण आरती पुरंदरे, प्रणाली देशमुख, प्रा.अंजली सिंगेवार, सुषमा ठाकूर, आशा अग्रवाल यांनी केले़ विजेत्यांना जयश्री ठाकूर, विमल शेट्टी, अमृता जैस्वाल, अनुराधा गिराम, अश्विनी जाधव, शततारका पांढरे, ज्योती कुलकर्णी, गायत्री तपके यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांमध्ये ललिता येमेवार, भावना सोलंकी, सुनीता लिंगापुरे, मंजुषा धारासूरकर, जया जैन, निवेदिता व्यास, पल्लवी जोशी, अनिता गव्हाणकर, सरिता गुंडेवार, पद्मा भराडिया, बरखा कासलीवाल, सविता गुर्रम,फाल्गुनी पारीख, शांभवी शेळके, ज्योती वाघमारे, श्यामा गच्छा यांचा समावेश होता.
संस्कार भारतीच्या रांगोळ्यांनी वेधले लक्ष संस्कार भारती नांदेडच्या सदस्यांनी भव्य रांगोळी काढून उपक्रमाची शोभा वाढविली़ मनपातर्फे सुभाष कुकडे व त्यांच्या जीव रक्षकाबरोबरच पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ मारवाडी युवा मंच तर्फे भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले. तर गुरुद्वारा लंगर साहब तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.