नांदेड- नीट परिक्षेत घालून ठेवलेल्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून ही परिक्षा रद्द करुन नव्याने घेण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी हजारो विद्यार्थी नांदेडच्या रस्त्यावर उतरले होते. त्यांनी एनटीएच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नांदेड शहरातील नीट परिक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातून दरवर्षी हजारो विद्यार्थी दाखल होतात. नीट परिक्षेमध्ये नांदेडच्या विद्यार्थ्यांच्या राज्यभरात दबदबा आहे. परंतु यंदा नीट परिक्षेत एनटीएने अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात काँग्रेसकडून महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी भाग्यनगर कमानीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यात हजारो विद्यार्थी हातात निषेधाचे फलक घेवून सहभागी झाले होते. नीटची परिक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यावेळी एनटीएच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.