- सुनील चौरे
हदगाव (नांदेड ) : झाडे लावा-झाडे जगवा असा संदेश देणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाची केदारनाथ येथील रोपवाटिका पाण्याअभावी जळून गेली अन् हजारो वृक्ष वाळून गेले़ पाण्याची व्यवस्था नसताना येथे रोपवाटिका सुरूच का केली? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे़
गतवर्षी तालुक्यासाठी २ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट शासनाचे होते़ ते पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील एकूण सात रोपवाटिकेमध्ये वृक्षनिर्मितीचे काम करण्यात आले़ त्यापैकी किती वृक्ष वाचले व किती जिवंत आहेत, हा विषय वेगळा़ परंतु यावर्षी जून-जुलैमध्ये वृक्षलागवडीचे उद्दिष्ट चार लक्ष आहे़ सामाजिक वनीकरण विभागाने यासाठी रस्त्यालगत वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले आहे़ प्रत्येक गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही झाडे लावायची आहेत़ त्यासाठी त्यांच्याकडे रोपे असणे आवश्यक आहे़ केदारनाथ येथे एक हेक्टर जागेमध्ये ही रोपवाटिका तयार करण्यात आली़ रोपे वाचविण्यासाठी कोणतेही शेड येथे नाही़ पाण्याची स्वत:ची व्यवस्था नसतानाही शेजारी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या भरवशावर ही रोपवाटिका सुरू केली़ त्यांचे पाणी कमी झाल्याने रोपांना पाणीच मिळेना़ त्यामुळे आजघडीला हजारो रोपे पाण्याअभावी कोमेजली़ यामध्ये मोह, आंबा, लिंब, वेळू या रोपांचा समावेश आहे़
ही रोपे पावसाळ्यापासून जोपासली होती़ तर त्यांची वाढ का झाली नाही? वाढली होती तर पाण्याची व्यवस्था का केली नाही? आता घाईघाईत येथे एक विहीर खोदण्यात आली़ २० फुटांवर साधारण पाणी लागले़ याचे पाणी एका प्लास्टिकच्या टाकीत घेवून ते रोपाला भर उन्हात देणे सुरू आहे़ दोन टाक्या या विहिरीचे पाणी सध्या रोपांना मिळते, परंतु हे पाणी अपुरे पडत असल्याचे रोजगारांनी सांगितले़ या कामावर एकूण आठ मजूर कार्यरत आहेत़ पैकी पाच यावेळी उपस्थित होते़ एक हेक्टर रोपवाटिकासाठी जागा असली तरी केवळ चार-दोन गुंठ्यामध्येच रोपे तयार करण्यात आली आहेत. रोपवाटिकेसाठी उन्हाची तीव्रता रोपांना जाणवू नये यासाठी हरित शेड असणे गरजेचे आहे, परंतु येथे ती व्यवस्था नाही़
मजुरांचे वेतन थकलेरोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना आठवड्याचे मानधन मिळणे बंधनकारक आहे, परंतु या कामावरील मजुरांना सहा महिन्यांपासून वेतन मिळालेच नसल्याचे कामाजी राठोड या मजुराने सांगितले़