नांदेड: संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरात खंडणी साठी अनेकांना धमक्या आल्या. बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ फरांदे आणि श्याम गुप्ता या दोन बांधकाम व्यावसायिकांना एक कोटींच्या खंडणीसाठी पत्र पाठविण्यात आले होते. पोलीस तपासात हे पत्र पैसे उकळण्यासाठी गुप्ता याच्या नातेवाईकाने पाठविल्याचे उघड झाले आहे. अशी माहिती विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी दोघांनी घरासमोर गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती, या प्रकरणाचा तपास सुरू असताना शहरात आणखी सहा जणांना खंडणी साठी फोन आले. त्यात बांधकाम व्यवसायात भागीदार असलेल्या कौस्तुभ फरांदे आणि श्याम गुप्ता यांना ही 1 कोटींच्या खंडणी साठी पत्र पाठविण्यात आले होते. हे पत्र पोस्टाने पाठविले होते. पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर गुप्ता यांचा नातेवाईक पुरूषोत्तम मानगुलकर याने पैसे उकळण्यासाठी हे पत्र पाठविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
घाबरू नका, पोलीस सोबत आहेतअनेक धमकीचे पत्र हे वैयक्तिक वादातून त्रास होण्यासाठी पाठविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. नागरिकांनी न घाबरता तक्रारी कराव्यात असे आवाहन तांबोळी यांनी केले.