नांदेड : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार कर्नाटक राज्यातील बिदर कारागृहातून पसार झाले होते. त्या तिन्ही गुन्हेगारांना पकडण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोडी या माली गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिखलीकर व पथक कार्यरत आहे. सदर पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ हे त्यांच्या पथकासह देगलूर ठाण्याच्या हद्दीत गेले असता त्यांना कर्नाटक राज्यातील पसार झालेले आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सदर आरोपींना अटक केली. यामध्ये कुख्यात गुन्हेगार नामदेव रामकिशन भोसले (रा. मंग्याळतांडा ता. मुखेड) व त्याचे दोन साथीदार भास्कर दादाराव चव्हाण (रा. जांभळी तांडा ता. मुखेड) व चाफरान पानबाबू भोसले (रा. निवघा ता. हदगाव) यांचा समावेश आहे. सदर आरोपी खानापूर परिसरात गुन्हे करण्याच्या तयारीने फिरत होते.
दरम्यान, त्यांना ताब्यात घेवून पोलिसांनी चौकशी केली असता यातील कुख्यात गुन्हेगार नामदेव भोसले हा २३ माली गुन्हे दाखल असलेला व मागील काळात बिदर कारागृहातून पसार झालेला आरोपी असल्याची माहिती उघडकीस आली. त्याचबरोबर या तिन्ही आरोपींनी देगलूर, नायगाव व लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारे घरफोड्या केल्याचीही कबुली दिली आहे. सदर आरोपीकडून आणखीन बरेच गुन्हे उघड होवू शकतात. त्यामुळे तिन्ही आरोपींना पुढील तपासकामी देगलूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
देगलूर येथील पोलिस निरीक्षक धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ, पोहेकॉ करले, सलीम बेग, पो.ना. बालाजी तेलंग, अफजल पठाण, पो.कॉ. देवा चव्हाण, पो.कॉ. रवी बाबर, बालाजी यादगिलवार, पद्मा कांबळे, चालक शंकर केंद्रे, हेमंत इचकेवार यांनी पार पाडले.