इस्लापूर (जि. नांदेड) : हैदराबाद येथील आठ महाविद्यालयीन विद्यार्थी सहस्त्रकुंड पाहण्यासाठी आले असता अचानक मुरली धरणाचे पाणी सोडल्यामुळे तीन विद्यार्थी त्यात बुडाले तर एकाला वाचविण्यात यश आले.
मंगळवारी (दि.१५) सकाळी ९ वाजेदरम्यान हैदराबाद येथील काही विद्यार्थी सहस्त्रकुंड पर्यटनासाठी आले होते. पाणी नसल्याने चार युवक कुंडामध्ये उतरले तर चार कडेला थांबले. अनेकांनी येथे सेल्फीही काढल्या. दरम्यान, मुरली धरणातून पाणी सोडण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. यावेळी आपत्कालीन भोंगाही वाजविला होता. पण उपयोग झाला नाही.
चौघे बुडत असल्याचे पाहून येथील बाळू चोपवाड, रामलू घंटलवाड, गोविंद मागीरवाड, पांडुरंग मागीरवाड यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यात नदीम खान (वय २८) याला वाचविण्यात यश आले. मात्र रफीयोद्दीन (वय २७), अकरम (वय २७), सोहेल (वय २८) हे तिघे सहस्त्रकुंडात बुडाले. इस्लापूर ठाण्याचे सपोनि रामेश्वर कायंदे, मेघेवाड, पोटे हे स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.