नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीची १९० सदस्यीय जम्बाे कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नुकतीच जाहीर केली असून, त्यात नांदेड जिल्ह्यातील तिघांना संधी देण्यात आली आहे. महानगराध्यक्षांना बढती मिळाल्याने नांदेडमध्ये नव्या अध्यक्षांचा शाेध सुरू झाला आहे. नाना पटाेले यांनी सर्व प्रदेशांना या कार्यकारिणीत स्थान देऊन समताेल राखण्याचा प्रयत्न केला. सर्व समाज, गट-तट डाेळ्यांपुढे ठेवून ही कार्यकारिणी बनविली गेल्याचे सांगितले जाते. १९० सदस्यीय कार्यकारिणीमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला ३१ पदे आली आहेत. सद्यस्थितीत काॅंग्रेसच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री अशाेकराव चव्हाण यांच्यामुळे मराठवाड्यात नांदेड हा हेविवेट जिल्हा मानला जाताे. मात्र प्रदेश कार्यकारिणीत या जिल्ह्याला तेवढे वेट दिले गेले नाही, असा सूर राजकीय गाेटात उमटताे आहे.
जिल्ह्यातून केवळ तिघांना राज्य कार्यकारिणीत संधी देण्यात आली. कार्यकारिणी जाहीर हाेण्याच्या दाेन दिवसपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी काॅंग्रेसचे नांदेड महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांना ‘प्रमाेशन’चा शब्द व्यासपीठावर दिला हाेता. ताे शब्द त्यांनी खरा करून दाखविला. राजूरकरांना महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. याशिवाय प्रदेश सचिव म्हणून डाॅ. श्रावण रॅपनवाड व ॲड. सुरेंद्र घाेडस्कर यांची वर्णी लावली गेली. या दाेघांच्या माध्यमातून पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी अनुक्रमे वडार व मातंग समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
राजूरकरांनी ४ वर्षांपूर्वी आव्हान स्वीकारले
ना. चव्हाण यांच्या आग्रहावरून जानेवारी २०१७पासून आमदार अमरनाथ राजूरकर यांनी नांदेड महानगराध्यक्षपदाची धुरा आव्हान म्हणून स्वीकारली हाेती. ना. चव्हाण यांच्या कसाेटीत ते खरेही उतरले. त्यांना बढती मिळाल्याने आता नांदेडसाठी काॅंग्रेसमध्ये नव्या महानगराध्यक्षांचा शाेध सुरू झाला आहे. अशाेकराव चव्हाण आपले वजन नेमके काेणाच्या पारड्यात टाकणार यावर नव्या महानगराध्यक्षांचे भवितव्य अवलंबून आहे.
चाैकट....
नव्या अध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात?
नांदेड महानगराचा नवा अध्यक्ष मुस्लीम समाजातून, लिंगायत समाजातून की अन्य कुण्या समाजातून निवडला जाताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषद मिळावी ही मुस्लीम समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र ती पूर्ण हाेऊ शकली नाही. आता किमान महानगराध्यक्ष पद तरी द्यावे असा या समुदायातील सूर आहे. मुस्लीम समाजातून चार ते पाच नावांची चर्चा आहे. त्याचवेळी लिंगायत समाजातूनही महापालिकेतील राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या एका विद्यमान नगरसेवकाच्या नावाबाबत अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय लिंगायत समाजातून इतरही काही नावे महानगराध्यक्ष पदासाठी रेटली जात आहेत. नव्या अध्यक्षांबाबत पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी अद्याप तरी काेणताही निर्णय घेतलेला नसून ते घेतील ताे निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही काॅंग्रेसच्या गाेटातून सांगण्यात आले.