शिवणी (जि. नांदेड ) : किनवट तालुक्यातील मौजे चिखली येथील दोन बालकांचा गावालगत असलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ग्रामस्थांनी बुडणाऱ्या एकाला बाहेर काढले. परंतु रुग्णालयात नेत असतानाच तिसऱ्या बालकाचाही वाटेतच मृत्यू झाला.
शिवणी परिसरातील दूर्गम भागात असलेल्या चिखली येथील गंगाधर लक्ष्मण भंडारवाड (वय १३), रितेश विठ्ठल देशट्टीवार (वय १०) आणि श्रीकर गोपाल नागूवाड (वय १४) हे तीन बालके मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी उतरले होते. दोन दिवसापूर्वीच या भागात जोरदार पाऊस आल्यामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यात या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकर नागूवाड याला ग्रामस्थांनी बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना श्रीकरचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सपोनि सुशांत किनगे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे चिखली गावावर शोककळा पसरली आहे.
पावसामुळे पाणीपातळीत वाढ सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळांना सुट्टी आहे. चिखली गावातील बहुतांश लहान मुले रिकामा वेळ असल्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये पोहण्यासाठी उतरतात. त्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्यात बुडाले.