नांदेड: नांदेडहुन अमृतसरकडे निघालेल्या सचखंड एक्सप्रेसला आज सकाळी रेल्वे स्थानकाबाहेर अपघात झाला. रेल्वे गाडी स्लोमोशनमध्ये असताना मागील तीन डबे क्लिपच्या बिघाडामुळे निसटले. त्यामुळे सुटलेले डब्बे सोडून रेल्वे शंभर मीटर अंतरावर जाऊन थांबली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
लॉक डाऊनच्या काळात नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून सचखंड एक्सप्रेस ही अमृतसरला नियमितपणे धावते. नांदेडला सचखंड गुरुद्वारा असल्याने दिल्ली, पंजाब या ठिकाणाहून शीख भाविक मोठ्या संख्येने नांदेडला येतात. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता निघालेली रेल्वे गाडी हुजूर साहेब रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच काही अंतरावर खडकपुरा पीट लाईनजवळ रेल्वेचे तीन डबे अनकपलिंग झाल्याने मागेच राहिले.
गाडी जवळपास शंभर मीटर पुढे गेल्यानंतर गार्डच्या सावधानतेमुळे ही बाब चालकास कळाली. त्यानंतर गाडी थांबविण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस पोहोचले. त्यानंतर कपलिंग दुरुस्ती करून तब्बल एक तासाभराने सचखंड गाडी पुढे सोडण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले.