नांदेड - अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे धनेगाव चौकात घडली. मृत तिघे मित्र असून लंकेश गवाले ,सतीश देवकांबळे ,विनोद दर्शने अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणाची समजलेली माहिती अशी की, मारतळा ता. लोहा जि. नांदेड येथील रहिवासी तथा मजूर लंकेश साहेबराव गवाले (वय-२१ वर्षे), सतिश रामचंद्र देवकांबळे (वय-१९ वर्षे, रा. गऊळ ता. कंधार) व विनोद अनिल दर्शने (वय-१८ वर्षे रा. मारतळा ता.लोहा) हे तीन तरूण १७ जून रोजी सायंकाळी मारतळा येथून ड्रेस शिवायला टाकण्यासाठी नांदेड शहराजवळील वाजेगाव येथे आले होते. रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास (एमएच-२६, बीटी-९८७५) दुचाकीवरून वाजेगावकडून मारतळा येथे परत जात होते. त्याचवेळी, नांदेड ते हैद्राबाद महामार्गावरील धनेगाव बायपास चौकाजवळील रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना पोउपनि. विठ्ठल दुरपडे, पोउपनि. गणेश होळकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी अधिक उपचारार्थ विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, डीवायएसपी. डॉ. सिध्देश्वर भोरे, प्रभारी पो.नि. अशोक घोरबांड, पोउपनि. गणेश होळकर व गुन्हे शोध पथकातील पोउपनि. शेख असद आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी संतोष साहेबराव गवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड पोलीस ठाण्यात १८ जून रोजी सायंकाळी आरोपी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे अंमलदार सहायक पोउपनि. डी. एन. मोरे व मदतनीस पो.कॉ. अश्विनी मस्के यांनी दिली आहे.