नांदेड : जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाल्यांचे भाव गडगडले आहेत; परंतु त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याने टोमॅटोचा तर लाल चिखल करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शहरात आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागात दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. इतवारा, जुना मोंढा, तरोडा नाका, पूर्णा रोड या ठिकाणी दररोज सकाळी भाजीपाला बाजार भरतो. गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी दरात हा भाजीपाला मिळत असला तरी शेतकरीवर्गाचे मात्र मोठे नुकसान होत आहे.
बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली असली तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा मात्र ग्राहकांना मिळत नाही. फार तर दोन ते तीन रुपये कमी दराने हा भाजीपाला विकला जात आहे, अशी नागरीकांची तक्रार आहे.- महेंद्र देमगुंडे
भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे; परंतु यामध्ये शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान आहे. प्रत्यक्षात ग्राहकालाही याचा विशेष फायदा होत नाही; परंतु नुकसान होऊ नये.
- विश्वास जाधव.