उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, विद्यापीठातील सहा संवैधानिक पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमधील शिक्षक -शिक्षकेतर पदांना मंजुरी दिली जाईल. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तीन अध्यासन केेंद्र मंजूर केले. त्याचवेळी विद्यापीठांतर्गत लातूर येथे विलासराव देशमुख अध्यासन केंद्र तसेच महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रही मंजूर करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील २६९ प्राचार्यांची, तसेच ३०० प्राध्यापकांची पदेही भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णयही सामंत यांनी घोषित केला. नांदेडसह लातूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात हे मार्गदर्शन केंद्र सुरू होईल. खास बाब म्हणून नांदेडचा समावेश करण्यात आल्याचेही ते म्हणाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय ॲट दी रेट नांदेड या उपक्रमांतर्गत १५ दिवसांत २ हजार ७९६ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ४४१ अर्जांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचीही उपस्थिती होती.