कासराळी : येथील सज्जाला तीन महिन्यांत तीन तलाठ्यांच्या बदलीचे चार आदेश महसूल विभागाने काढले आहेत. ज्यामुळे तीन महिन्यांत तीन तलाठी बदलले, तर सध्या मूळ अटकळी सज्जाहून कासराळी सज्जाला पदभारावर आलेल्या तलाठ्यास तब्बल ३० कि.मी. अंतर पार करून यावे लागते.
९०० पेक्षा अधिक खातेदार संख्या असेल्या कासराळी येथील सज्जाहून तलाठी एन. एस. मोताळे यांची बिलोली सज्जाला बदली झाली. तब्बल पंधरा दिवसांनंतर महसूल विभागाने सचिन आरू यांच्या नावाने तलाठी म्हणून आदेश काढले. त्यांच्या खाजगी अडचणीने येथील पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची बदली झाली. पुन्हा व्ही. जी. कुलकर्णी यांचे कासराळी सज्जासाठी तलाठी म्हणून आदेश काढण्यात आले. त्यांनी पदभार स्वीकारून सज्जाचे कामास सुरुवातही केली. तब्बल एक महिना कुलकर्णी यांनी या सज्जाला सेवा दिली. मात्र, पुन्हा त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यांच्यानंतर पुन्हा कासराळीहून तब्बल ३० कि.मी अंतरावर असलेल्या अटकळी सज्जाचे तलाठी सचिन आरू यांना कासराळी सज्जाचा अतिरिक्त भार देण्यात आला. वास्तविक कुलकर्णी यांच्याकडे असलेला गागलेगाव सज्जा व कासराळीचे अंतर पंधरा कि.मी.चे असताना त्यांना न ठेवता महसूल विभागाने ३० कि.मी. लांब असलेल्या अटकळी सज्जाचे तलाठी आरू यांना पदभार दिला. यामुळे शेतकरी, नागरिक यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने दखल घेऊन कासराळीसाठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.