- अनुराग पोवळे
नांदेड : परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून आणखी एक मोहीम हाती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी १५ ते ३० जून या कालावधीत राबवलेल्या पटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. जिल्ह्यात यंदा बालकांचा शिक्षण हक्क कायद्याचीही अंमलबजावणी प्रभावीरित्या झाल्यामुळे यंदा मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मोफत प्रवेश झाले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील २६२ शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश मिळाला आहे. २०१३-१४ मध्ये ४९२, २०१४-१५ मध्ये ७०९, २०१५-१६ मध्ये १०५४ आणि २०१६-१७ मध्ये १०२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यंदा झालेल्या जनजागृतीमुळे प्रवेशाची संख्या उच्चांकी झाली आहे.
आईवडिलांच्या रोजगार प्रश्नामुळे शाळेपासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांसाठीही जिल्ह्यात हंगामी वसतिगृह चालवले जातात.या वसतिगृहातही जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. हे विद्यार्थी शाळेतच राहावे या हेतूने ३१ मार्चपर्यंत वसतिगृह चालवली जातात. ही वसतिगृह मुखेड, लोहा, कंधार, नायगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू करावी लागतात.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा विशेष मोहीम जिल्ह्यात वीटभट्टी तसेच इतर ठिकाणी कामावर असलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणले जाणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या १०२ विषय तज्ज्ञांमार्फत शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणले जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या साखर कारखाना परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही परिसरातच शाळा सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यात आजघडीला येळेगाव, वाघलवाडा, कुंटूर, बा-हाळी, हदगाव येथील कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.