- युनूस नदाफपार्डी ( नांदेड ) : अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील बालशौर्य पुरस्कारप्राप्त एजाज नदाफने बारावीत ८२ टक्के गुण संपादित करून उत्तीर्ण झाला आहे. मात्र, आजही तो घरप्रपंच चालविण्यासाठी केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करतो. त्याला नोकरी लागेल का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. देशातील सर्व खेळाडूंना व बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे. एजाज नदाफने कोणती तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून बारावी उत्तीर्ण झाला. ( Time of wage labor on National Child Bravery Award Winner Ejaz Nadaf)
नववीत असताना त्याने दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होता. अर्धापूर तालुक्यातील पार्डी गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदीच्या बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुलींना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या होत्या. आरडाओरडा झाल्याने खेळायला जाणाऱ्या एजाजने मागचा -पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारून चारपैकी दोघींचे प्राण वाचविले. एका मुलीचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एजाज नदाफने केले होते.
या शौर्याची दखल घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते. राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफला सर्व स्थरातून मान - सन्मान मिळाला. सर्वत्र सत्कार करण्यात आला. मात्र, त्यानंतर एजाज नदाफची कोणीही विचारपूस केली नाही. कोणतीही मदत मिळाली नाही. जिल्हा परिषदेकडून घरकुलाचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. आताही तो मोडक्या घरात राहात आहे. एजाज नदाफच्या हलाखाली परिस्थितीमुळे केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करतो.
आर्मी किंवा पोलीसात जाण्याची इच्छाराष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफची इच्छा पोलीस किंवा आर्मीत जाण्याची आहे. मात्र, त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एजाज बारावीत ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला असून, केळीच्या गाड्या भरण्याचे काम करीत आहे.