हदगाव ( नांदेड) : माळझरा येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका चिमूकल्याने काजव्यांसाठी देवळीत हात घातला मात्र, आत बसलेल्या विषारी सर्पाने त्याला दंश केला. या चिमूकल्याचा आज, मंगळवारी ( दि. २४ ) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार्तिक माधव खोकले (८) असे मृताचे नाव आहे.
रविवारी शाळेला सुटी असल्याने कार्तिक आईबाबा सोबत शेत गेला होता. तिथे खळखळ वाहणारे पाणी, फुलपाखरू काजवे पाहून चिमुकला भारावून गेला. त्याने कुतुहलाने काही काजवे रिकाम्या काडीपेटीत बंद करून घरी आणले. कोणी घेऊ नये म्हणून काडीपेटी घरातील एका देवळीत सुरक्षित ठेवली. दरम्यान, सोमवारी ( दि. २३) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर कार्तिक मोठ्या उत्साहात काजवे ठेवलेली काडीपेटी घेण्यासाठी देवळीकडे गेला. मात्र, देवळीत आधीच विषारी साप दडून बसला होता. कार्तिकने आत हात घालताच काजवे हाती लागले नाही तर देवळीतील सर्पाने त्यांना दंश केला. नातेवाईकाने त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आज, मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. निरागस चिमूकल्याच्या मृत्यूची वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली आहे.