नांदेड : दिवाळी सणात अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थांसह चवदार फराळांची मेजवाणी असते़ परंतु, ज्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशांना मात्र दिवाळी काय अन् दसरा काय अशीच अवस्था असते़ अशा गरिबांसोबत दरवर्षी तिरंगा परिवार दिवाळी साजरी करते़ दिवाळीत सलग पाच दिवस सदस्यांकडून गरीब लोकांना दिवाळी फराळाच्या कीटचे वाटप करण्यात येते़ बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे़तिरंगा परिवाराच्या वतीने गरजवंतांना अंगभर झाकण्याइतपत कपडे मिळावे म्हणून, तिरंगा कपडा बँक सुरु करण्यात आली आहे़ वर्षभर या कपडा बँकेच्या माध्यमातून गरजवंतांना कपडे वाटप केले जातात़ वापरात नसलेले ; पण सुस्थितीत असलेले कपडे नागरिक या ठिकाणी दान करतात़ दिवाळीपूर्वीच तिरंगा परिवाराने तीन दिवस वस्त्र वाटप महोत्सवाचे आयोजन केले होते़ या महोत्सवाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला़या ठिकाणी गोळा झालेल्या कपड्यातून हजारो गरिबांना दिवाळीत कपडे मिळाले़ त्यानंतर दिवाळीमध्ये सर्वत्र गोडधोड पदार्थांची रेलचेल असते़ परंतु, ज्यांच्या दोनवेळच्या जेवणाचीही सोय नसते़ अशांच्या मदतीला तिरंगा परिवाराचे सदस्य धावून जातात़ मागील वर्षीपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ प्रत्येक परिवाराला फराळाच्या एका कीटचे वाटप करण्यात येते़ साधारणत: दीडशे रुपये किंमत असलेल्या कीटमध्ये चिवडा, चकली, लाडू यासह इतर पदार्थ असतात़ दिवाळीत गरिबांचे तोंड गोड व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे़ बुधवारपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे़जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते शहरातील काही भागांत दिवाळी फराळ कीटचे वाटपही करण्यात आले़ यावेळी तिरंगा परिवाराचे मिर्झा फय्याज बेग, प्रा़विजयश्री पेंडकर, सुधाकर बंडेवार, अशोक जोशी, राजीव जैन, केशव पा़वानखेडे, मोईझ खान, राजेश यादव, एम़डी़नवाझ, प्रवीण सुरपाम, सलमान खान, आदिल चिनी, साजिद विंदानी, मिर्झा साहिब बेग, बालाजी पोटे आदींची उपस्थिती होती़
तिरंगा परिवाराची दिवाळी गरिबांसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:16 AM
दरवर्षी तिरंगा परिवार दिवाळी साजरी करते़ दिवाळीत सलग पाच दिवस सदस्यांकडून गरीब लोकांना दिवाळी फराळाच्या कीटचे वाटप करण्यात येते़ बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे़
ठळक मुद्देफराळ किटचे वाटप अनेक दानशूर मंडळींचा उपक्रमात सहभाग