नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डान योजनेअंतर्गत नांदेडविमानतळाला गेल्या वर्षभरापासून अच्छे दिन आले आहेत़ आता मंगळवारपासून नांदेड-चंदीगड ही विमानसेवा सुरु होणार आहे़ या विमानाची सर्व बुकींग हाऊसफुल्ल झाली आहे़नांदेडात जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा असून या ठिकाणी देशविदेशातील भाविक दर्शनासाठी येतात़ त्यांना यापूर्वी नांदेडला येण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागत होता़ यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होत होता़ त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने नांदेड-चंदीगड ही विमानसेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा सुरु होता़ त्याला एअर इंडियाने हिरवा कंदिल दाखविला होता़ मंगळवारी नांदेडातून या सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे़ चंदीगड येथून सकाळी ९ वा़ १० मिनिटांनी विमान निघणार असून ते नांदेडातील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर सकाळी साडेअकरा वाजता पोहोचणार आहे़चंदीगडहून नांदेडला येणाऱ्या विमानातील सर्व १६० प्रवाशांची बुकींग झाली आहे़ तर नांदेडहून चंदीगडला जाण्यासाठी १३० प्रवाशांनी बुकींग केली आहे़ मंगळवारच्या पहिल्या विमानाने हे प्रवासी चंदीगडला जाणार आहेत़ दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी नांदेडहून विमान निघणार असून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ते चंदीगड विमानतळावर पोहोचणार आहे़ आठवड्यात मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ही विमानसेवा सुरु राहणार आहे़ नांदेडातून सध्या हैदराबाद, मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि चंदीगडसाठी विमानसेवा सुरु झाली आहे़ त्यामुळे प्रवासी आणि भाविकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे़
आजपासून नांदेड-चंदीगड विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:10 AM