गडकरी म्हणाले, आपल्या देशात कशाचीही कमी नाही. गरज आहे ती त्याला नावीन्यपूर्णतेने सादर करण्याची, नव्या तंत्रज्ञानासह उपयोगात आणण्याची, राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्याची. हे सर्व करण्यामध्ये आपल्या युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. आज आपण अनेक गोष्टी, अनेक वस्तू आयात करतो. त्यामुळे देशाचा बराच पैसा हा देशाबाहेर जातो. अनेक विकसित देश आपल्याकडून कच्चा माल स्वस्तात घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून तोच माल आपल्याला महागात विकतात आणि श्रीमंत होतात. यापुढे या गोष्टी घडू नयेत, हेच आपल्या युवकांनी मनावर घेतले पाहिजे.
स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे जाताना देशात नवीन तंत्रज्ञान विकसित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आज शेती व्यवसायामध्ये आपण अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. पावसाचे पाणी साठविणे अथवा जिरविणे, सोलर एनर्जीचा वापर, ड्रिप एरिगेशन, स्वतःचे स्वस्त बियाणे वापरणे, सेंद्रिय खतांचा वापर, इत्यादी बाबींचा जर आपण नियोजनपूर्वक वापर केला तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.
कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही देशाची सुपर पॉवर दिशेकडे जाण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे देशाचा सर्वांगीण विकास साधणे अथवा सर्वांगीण प्रगती करणे म्हणजेच ‘आत्मनिर्भर भारत’ होय. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा. विद्यापीठाने १०० वर्षे पुढचा विचार करावा. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करावा. विद्यापीठाने देश सुपर पॉवर बनविण्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले; तर कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.