पाण्यात बुडून मृत्यू
अर्धापूर - तालुक्यातील दांडेगाव नदीपात्रात बालाजी नामदेव बिचकुले (वय ४९, रा. सावरगाव) हे नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मरण पावले. कोंढा येथील कार्यक्रमास पायी जात असताना ते नदीतून जात होते. तेव्हा ही घटना घडली.
प्रसिद्धीप्रमुखपदी कावटवार
देगलूर - तालुका भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी साईनाथ कावटवार यांची निवड झाली. शहर ओबीसी आघाडी शहर उपाध्यक्ष नितीन दुप्पेवार, शहर उपाध्यक्ष गणेश तिम्मलवार, चिटणीसपदी नागेश मारावार, सरचिटणीसपदी गंगाधर रणवीरकर यांची निवड झाली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
हरसदचे निर्जंतुकीकरण
लोहा - तालुक्यातील हरसद ग्रामपंचायतीने गावाचे निर्जंतुकीकरण केले आहे. गावातील रस्ते व प्रमुख ठिकाणी फवारणी करण्यात आली. यावेळी तुकाराम जामकर, संजय भालेराव, सुभाष पाटील, विष्णू पाटील, इंद्रा पाटील, दामाजी ठाणेकर, भीमराव भालेराव आदी उपस्थित होते.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
भोकर - भोकर ते म्हैसा रस्तयाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार भीमशक्ती संघटनेने केली. टेंडरनुसार काम सुरू नाही. सध्या हे काम ड्रम मीक्सरने सुरू आहे. साध्या पॉवरचाही उपयोग केला जात आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले.
सुनील राठोड यांची मागणी
मुखेड - वसंतराव नाईक यांच्या समाधी स्थळावर १८ मार्च रोजी वीज पडली. त्यामुळे समाधी स्थळाचे नुकसान झाले असून नागपूरच्या दीक्षा भूमीच्या पार्श्वभूमीवर सौंदरीकीकरण करण्याची मागणी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील राठोड यांनी केली. निवेदनाच्या प्रती त्यांनी संबंधितांना पाठवल्या आहेत.
पेवर ब्लॉकचे उद्घाटन
नांदेड - मनपा नगरसेवक स्वेच्छ निधीअंतर्गत नगरसेवक श्रीनिवास जाधव यांनी बालाजी मंदिर देवस्थान हडको येथे ३ लाख रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसविले. पेवर ब्लॉकचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार, करणसिंघ ठाकूर, बाबुराव येळगेवार, सुभाष कारंजकर, रमेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड, डॉ.नरेश रायेवार, बजरंग भेंडेकर, सुदर्शन कांचनगिरे आदी उपस्थित होते.
अवैध वृक्षतोड जोरात
देगलूर - तालुक्यातील हणेगाव व मरखेल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सावळी, वन्नाळी, किनी, हणेगाव, वझर, कुडली आदी गावालगतच्या शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. कनार्टकातील व्यापारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत असल्याची तक्रार आहे.