दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
By शिवराज बिचेवार | Published: July 30, 2022 11:20 AM2022-07-30T11:20:48+5:302022-07-30T11:24:15+5:30
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली, मुख्यमंत्री महोदय, आता सांगा ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा
नांदेड: अतिवृष्टीमुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. मयताची पत्नी छोटा मुलगा मला भेटला, आता तुम्हीच सांगा मुख्यमंत्री महोदय 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा, असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला. तसेच दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव असा हल्लाबोल पवार यांनी शिंदेंवर केला.
माहूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी ते आले होते. पवार म्हणाले, आम्हाला याच्यात राजकारण करायचे नाही, हे आम्ही अगोदरच स्पस्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मला सांगायचे आहे, आम्ही दौरा करतोय, तुम्ही त्याचीच चर्चा करीत आहात, त्यापेक्षा तुम्ही तुमच काम करा, आम्ही आमचे करतो. एवढे नुकसान होऊन अजून पंचनामे नाहीत. देवस्थान च्या जमिनी अनेकजण कसत आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तुम्ही सगळीकडे फिरत आहात, त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यावर आलेल्या या संकटात शेतकऱ्यांना विश्वास द्या ना की तुम्ही आत्महत्या करू नका. फक्त संकटातून बाहेर काढेल अस बोलले जाते, कधी बाहेर काढणार, असा सवालही पवार यांनी केला.
दौरे महत्वाचे आहेत का ?
फक्त इकडे तिकडे फिरणं सुरू आहे. लोकांच्या जीवपेक्षा तुम्हाला दौरे महत्त्वाचे आहेत का, असा आरोप पवार यांनी केला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक हे उपस्थित होते.