नांदेड : दिल्लीच्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाल्यानंतरही बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असा गाजावाजा करण्यात आला़ परंतु त्यानंतर सुसंस्कृत समजल्या जाणार्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी, यवतमाळातील नेर येथील बलात्काराच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले़ नांदेड जिल्ह्यातही बलात्काराच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांचा आलेख चढताच आहे़ गेल्या वर्षभरात एकट्या नांदेड जिल्ह्यात बलात्काराच्या ८१ घटना घडल्या आहेत़ त्यामुळे भय इथले संपत नाही असेच म्हणावे लागेल.
नांदेड जिल्हा हा विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे़ त्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारचे गुन्हे घडतात़ येथे गुन्हा केल्यानंतर आरोपी थेट आंध्रात किंवा पंजाबात पळून जातात़ त्यामुळे तोकडे मनुष्यबळ असलेल्या पोलीस दलालाही मर्यादा पडतात़ कोपर्डीच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या़ परंतु खर्या अर्थाने या योजना प्रत्यक्ष पीडितापर्यंत पोहोचल्याच नसल्याचे दिसते़ महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाच्या वतीने हेल्पलाईन सुरु करण्यात आली़ प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष आहे़, परंतु महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ महिन्याला सरासरी जिल्ह्यात बलात्काराच्या आठ घटना घडल्या आहेत.
त्याचबरोबर इतर गुन्ह्यांचीही तीच परिस्थिती आहे़ गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५६ खून झाले़ त्यातील ५२ प्रकरणे उघडकीस आणण्यात यश मिळाले़ ७४ जणांवर खुनाचा प्रयत्न करण्यात आला़ दरोड्याच्या १२ घटना घडल्या़ त्यातील १० घटना उघडकीस आल्या़ जबरी चोरी आणि घरफोडीचे प्रमाणही मोठे आहे़ जबरी चोरी ४४ तर घरफोडीच्या २८२ घटना घडल्या आहेत, परंतु चोरट्यांवर अंकुश ठेवण्यात पोलीस प्रशासनाला अपयशच आल्याचे दिसते़ २८२ चोरीच्या घटनांपैकी केवळ ७१ प्रकरणांचा छडा लावण्यात आला़ तर इतर सर्व प्रकारच्या ७३८ चोर्या झाल्या आहेत़ वादग्रस्त वक्तव्य, वर्तन करुन दंगा करणार्या १७८ घटना घडल्या आहेत़ तर दुखापतीचे ९४४ गुन्हे घडले आहेत़ जिल्ह्यात अशाप्रकारे जवळपास वेगवेगळे चार हजारांवर गुन्हे घडले आहेत.
मोबाईल चोरीचे फक्त १२० गुन्हेनांदेड शहरात दररोज सरासरी चार ते पाच जणांचे मोबाईल चोरी गेल्याच्या घटना घडतात़ आठवडी बाजाराच्या दिवशी तर हे प्रमाण खूप जास्त असते़ परंतु पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार सहजासहजी नोंदवून घेतली जात नाही़ असेच आजवरच्या पाहणीत आढळून आले़ केवळ त्याच क्रमांकाचे सीमकार्ड मिळविण्यासाठी साधा अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो़ त्यामुळे गेल्या वर्षभरात मोबाईल चोरीचे जिल्हाभरात केवळ १२० गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यातील ३७ गुन्ह्यांचा तपास लागला आहे़ त्याचप्रमाणे वाहन चोरीच्या घटनांकडेही गांभीर्याने पाहिले जात नाही़ जिल्ह्यात वाहन चोरीच्या ३१४ घटना घडल्या असताना पोलिसांना केवळ ५४ प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे़ जुगाराचे ५५३, दारु विक्रीचे २६९६, आर्म्स अॅक्टचे ३५ गुन्हे घडले आहेत़