मंगल कार्यालय चालकांना फटका
नांदेड : कोरोना लाॅकडाऊनमध्ये मंगल कार्यालय चालकांना आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये शहरातील मंगल कार्यालय कार्यक्रमाअभावी बंद आहेत. परिणामी, या मंगल कार्यालयाशी संलग्न असणारे इतर व्यावसायिकही आर्थिक संकटात आहेत. अनलाॅक झाले असले तरी लग्नतिथी संपत आल्या आहेत.
मालेगाव रस्त्यावर जनावरांचा मुक्त संचार
नांदेड : शहरातील मालेगाव रस्त्यावर जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यात अनलाॅक झाल्याने शहरातील गर्दीत वाढ झाली असून, जनावरांमुळे अपघात घडत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर कुत्रे, गाई यांसह अन्य जनावरे ठाण मांडून बसत आहेत. मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोना नियमावलीचा दुकानदारांना विसर
नांदेड, सोमवारपासून संपूर्ण बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे. परंतु, गर्दी होऊ नये तसेच मास्क, सॅनिटायझर वापर अनिवार्य करून नियम घालून दिले आहेत. परंतु, बहुतांश दुकानदारांकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. दुकानात माल दाखविणाऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत कोणीही मास्कचा वापर करत नाही.
वळण रस्त्याची कामे पूर्ण करण्याची मागणी
नांदेड, शहरातील पश्चिम वळण रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ते पूर्ण करावे, अशी मागणी माजी सरपंच बंडू पावडे यांनी केली आहे. लातूर फाटा येथून पावडेवाडी-पूर्णा रस्त्याला जोडणारा रस्ता अर्धवट असून, तो पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा.
मोर चौकातील खड्ड्यांमुळे अपघात
नांदेड, शासकीय विश्रामगृह ते छत्रपती चौक या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात मोर चौक परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील संपूर्ण खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी विजय माळोदे यांनी केली आहे.
शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
नांदेड, नांदेड जिल्हा खासगी हॉस्टेल असोसिएशनच्या वतीने श्यामनगर येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गजानन मोरे, संदीप नरवाडे, तेजस पाटील, भुजंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.