भोकर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तयार होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने आणखी किती काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुदखेड - आदिलाबाद रेल्वे मार्गावरील मालवाहतूक व प्रवासी रेल्वेची संख्या भरपूर असल्याने वारंवार रेल्वे फाटक लागून वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने उड्डाणपूल मंजूर झाला. दीड वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली. यातील रेल्वे रुळावरील पुलाचे काम रेल्वे प्रशासनाकडून तर उर्वरित काम राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने होत आहे. दीड वर्षांपूर्वी सुरु झालेले शहरातील रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून होणाºया रेल्वे रुळावरील पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवातच झाली नाही. संबंधित कंत्राटदाराने काम सुरु करण्यासाठी नारळ फोडण्याची घाई केली़ परंतु प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरवात केली नाही. यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी संपणार याची प्रतीक्षा लागली आहे.अर्धवट कामामुळे मागील दीड वर्षांपासून वाहतूक कोंडी सोबतच धुळीचा त्रास होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना आणखी किती काळ उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाकडे असलेल्या उड्डाणपुलाचे काम करणाºया कंपनी कंत्राटदारास लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी चर्चा होत आहे.
भोकर उड्डाणपुलाच्या कामात रेल्वेची दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:36 AM