प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:54 AM2019-02-07T00:54:01+5:302019-02-07T00:54:59+5:30
काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे.
नांदेड : काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी व लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार रुजविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण घेण्यात येत असून हे शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
शहरातील आशीर्वाद गार्डन येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात दुसºया दिवशीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रशिक्षण शिबिराचे राज्य समन्वयक आ. रामहरी रूपनर, माजी खा. तुकाराम रेंगे, आ. डी. पी. सावंत, आ.वसंतराव चव्हाण, पक्षाचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर शीला भवरे, माजी आ. माधवराव जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह सत्संग मुंडे, हरिभाऊ शेळके, लियाकत अली अन्सारी, प्रशिक्षक राजीव शाहू, नैशद परमार, लेखा नायर, विनोद नायर यांची उपस्थिती होती.
खा. चव्हाण म्हणाले की, लोकांचा वाढलेला काँग्रेसमधील जोश आता मतात रूपांतरित करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण खूप केले आहे, पण सांगण्यासाठी कमी पडतो. त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देश आणि राज्य वाचविण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. जनता शासनावर नाराज आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन काँग्रेसचा विचार प्रभावीपणे मांडावा, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपने केलेला जातीवाद, धर्मवाद त्यासोबतच काँग्रेसचा सुरू केलेला अपप्रचार या सर्व बाबी आपल्याला हाणून पाडायच्या आहेत. त्यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नांदेडमधील हे २२ वे शिबीर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उर्वरित जिल्ह्यांतही शिबिरे होणार असून २३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलेले असेल असे ते म्हणाले. यावेळी मुख्य समन्वयक रामहरी रूपनर व आ.अमरनाथ राजूरकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. शिबिराच्या सुरूवातीस आ. डी. पी. सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव गुंडले व शहराध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे यांनी यावेळी सलामी दिली. सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.