नांदेड/हिंगोली/मुंबई - हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी केल्यानंतर शिवसेनेने जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत त्यांची घरवापसी झाली. वानखेडे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. तर, आज नांदेड येथेही त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड येथे आले असता कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन येथे त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना त्यांच्या नेतृत्वात पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना, वानखेडे यांनी बंडखोर आमदार-खासदारांना गद्दार असे संबोधत थेट इशारा दिला. सुभाष वानखेडे म्हणाले की, गद्दार आमदार खासदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व त्यांना शिवसेनेस्टाईलने धडा शिकवला जाईल. तसेच, पक्षवाढीसाठी देखील आम्ही गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे उपक्रम राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिलेदारांना एकत्र करण्याचे सत्र सुरू केले आहे. खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचे पडसाद उमटत आहेत. तर इकडे वानखेडे यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आले. नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणली. शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. सुभाष वानखेडे हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेत होणारी मोठी होणारी फुट टाळता येईल अशी पक्षाला आशा आहे.
शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य
वानखेडे यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये व नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्ययालयाचे दिसून येत आहे. यावेळी मातोश्रीवर नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्ह्यातील पदाधिकारी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, भुजंग पाटील, माधवराव पावडे, धोंडू पाटील, आष्टीकर भुजंग पाटील माधवराव पावडे, धोंडू पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, आनंदा बोंढारेसह अनेक शिवसेना पदाधिका-यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रवेशाचा हदगांव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.