शरद वाघमारे।मालेगाव : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे गत सात वर्षांपूर्वी दीड कोटी कोटी रुपये खर्च करून ट्रामा युनिट केयर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, ग्रामीण रुग्णालय संलग्नित नसल्याने हे युनिट धूळखात पडले होते. ट्रामा केअर सुरू होण्यासाठी वेळोवेळी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित केले होते. सदरील ट्रामा केयर काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.मालेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सात वर्षांपूर्वी ट्रामा केयर युनिटसाठी मंजुरी दिली होती. यासाठी प्रशस्त इमारत, तज्ज्ञ डॉक्टर, व इतर कर्मचारीवर्ग यांची पदे ही निर्माण करण्यात आली होती. परंतु पुढे मात्र हे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय असणे आवश्यक असल्याची प्रशासकीय अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे ते सुरू होत नव्हते.लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय निर्मितीसाठीचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून पाठविण्यात आला होता. परंतु, आरोग्य उपसंचालक विभागाने मात्र सदरील प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला नसल्याने मालेगाव येथील ट्रामा केयर युनिट धूळ खात पडले होते. ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून त्या साठी २५ डॉक्टर व कर्मचारी वर्ग आवश्यक असल्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. मालेगाव येथून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग असून याच रस्त्यावर ट्रामा केयर आहे.अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी या रस्त्यावर दवाखाना नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे बंद पडलेले ट्रामा केयर युनिट सुरू व्हावे यासाठी लोकमत ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मालेगाव येथील ट्रामा केयर युनिट सुरू करण्यासाठी नुकतीच लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी भेट देऊन पाहणी केली. येत्या काही दिवसांत येथे बाह्यरुग्ण सुरू होणार आहे. यासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाहणीवेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे यांची उपस्थिती होती. तब्बल सात वर्षांपासून बंद असलेले मालेगाव येथील ट्रामा केयर युनिट सुरू होणार असल्याने अपघातग्रस्त रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. मालेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सात वर्षांपूर्वी ट्रामा केयर युनिटसाठी मंजुरी दिली होती.
अपघातग्रस्तांना ट्रामामध्ये मिळणार उपचारमालेगाव येथील ट्रामा केयर युनिट सेंटरमध्ये बाह्यरुग्ण विभाग लवकरच सुरु केला जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. शासकीय रुग्णालयाकडे हे ट्रामा केयर हस्तांतरित करण्यात आले आहे. लवकरच बाह्यरूग्ण विभाग सुरू होणार आहे़ - डॉ. अविनाश वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी़
साडेपाच कोटी रूपयांचा निधी अपेक्षितग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून त्यासाठी २५ डॉक्टर व कर्मचारी वर्ग आवश्यक असल्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. मालेगाव येथून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग असून याच रस्त्यावर ट्रामा केयर आहे. अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी या रस्त्यावर दवाखाना नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. बंद पडलेले ट्रामा केयर युनिट सुरू व्हावे यासाठी ‘लोकमत’ ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मालेगाव येथील ट्रामा केयर युनिट सुरू करण्यासाठी नुकतीच लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. माले यांनी भेट देऊन पाहणी केली.