निवघा बाजार (जि.नांदेड) : गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन सराफा व्यापारी फरार झाल्याची घटना हदगाव तालुक्यातील निवघा (बा.) येथे उघडकीस आली आहे. सदर व्यापारी हा परराज्यातील असून त्याने ग्राहकांचे जवळपास ५० लाखांचे दागिने घेऊन दुकानाला कुलूप ठोकत धूम ठेकली आहे. पण, अजूनही तक्रार देण्यासाठी एकही ग्राहक पुढे आला नाही.
हदगाव तालुक्यातील निवघा (बा.) येथे सराफांची दुकाने बऱ्यापैकी आहेत. परिसरातील ग्राहक सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी व विक्री करतात. तर काहीजण सराफाकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवून तीन रुपये टक्के व्याजदराने कर्ज घेतात. हंगाम आला की शेतकरी व्याजासह रक्कम देऊन दागिने सोडून घेतात, अशी प्रथा बऱ्याच वर्षांपासून निवघा येथे सुरू आहे. या व्यवहारात कधी कधी वाद होतात पण ते चव्हाट्यावर येत नाहीत. जवळपास एक वर्षापूर्वी निवघा (बा.) येथे सोन्या-चांदीचे नवीन दुकान सुरू झाले होते. सदर व्यापारी हा परराज्यातील होता. वर्षभर त्याने गावात आणि परिसरात चांगला व्यवहार करून लोकांचा विश्वास संपादन केला. तो इतर सराफांप्रमाणे ग्राहकांचे दागिने गहाण ठेवून तीनऐवजी दोन रुपये टक्के दराने रक्कम देत असल्याने अल्पावधीतच ज्वेलर्स नावारूपाला आले.
दोन महिन्यांपासून झाला पसारसदर व्यापारी जवळपास ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन मागील एक ते दोन महिन्यांपूर्वी पसार झाला आहे. त्यामुळे सदर ज्वेलर्स बंदच आहे. प्रतिष्ठेपोटी काहीजण कुणाला काही सुगावा न लागता घरातील दागिने सराफाकडे गहाण ठेवून कर्ज घेतात. असे कर्ज अनेक ग्राहकांनी दागिने ठेवून घेतलेले आहे. पण, व्यापारीच पसार झाल्याने गावांत चर्चेला उधाण आले आहे.