नांदेड : वारीस दे पंजाब या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग हा गेल्या नऊ दिवसांपासून फरार आहे. सात राज्यांतील पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याच्या मागावर आहे. नांदेडातही अमृतपाल सिंगचे समर्थक आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री पोलिसांनी शहरातील काही भागात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून घरांची झाडाझडती घेतली. यावेळी वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांचीही कसून चौकशी करण्यात आली.
देशविघातक कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून पंजाब पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांची धरपकड करण्यात येत आहे. या संघटनेने एकेएफ नावाचे सैन्य, स्वत:चे चलन आणि खलिस्तानचा वेगळा नकाशाही तयार केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे देशभरातील तपास यंत्रणा अलर्ट आहेत. पंजाबमध्ये गुन्हा केल्यानंतर अनेक गुन्हेगार हे आश्रयासाठी येतात. त्यामुळे नांदेड पोलिस बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवून आहे.
वारीस दे पंजाब या संघटनेचे नांदेडात अनेक सदस्य आहेत, तर काही तरुण भिंद्रानवालेचे छायाचित्र आपल्या स्टेट्सवर ठेवतात. त्यातच अमृतपाल नांदेडात येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. अनेकांची कसून चौकशी करण्यात आली. नेमके किती जणांना पोलिसांनी उचलले याबाबत मात्र माहिती कळू शकली नाही.
सायबर सेलचे काम वाढले
अमृतपालवर कारवाईच्या वेळी पंजाबच्या काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. नांदेडातही सोशल मीडियाद्वारे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सायबर सेलकडून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येत आहे. अफवेला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तीर्थयात्रेला म्हणून काही जण भूमिगत
नांदेडातील अमृतपालचे काही समर्थक तीर्थयात्रेचे निमित्त करून भूमिगत झाल्याची माहिती आहे. ते नेमक्या कोणत्या तीर्थयात्रेवर गेले याची माहिती आता पोलिस घेत आहेत.