किनवट (नांदेड ) : वनविकास महामंडळाने विरळणी, निष्काषनच्या नावाखाली जंगलातील झाडांची तोड सुरु केली. त्यामुळे जंगलाचे वाळवंट होत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या आरोपाचा वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
१९७६ मध्ये वनाचा विकास करण्यासाठी व रोपे लावून त्यांचे संगोपन, संरक्षण करणाऱ्या वनविकास महामंडळाने प्रथम रोपे तयार करणे, त्यानंतर त्याची लागवड करणे हे काम केले़ वनविकास महामंडळाची १७ हेक्टर क्षेत्रात नर्सरी होती व आता केवळ कार्यालय आहे़ गत २० वर्षांपासून रोपे लागवड न करता नर्सरी न करता काही झाडे तोडण्याचा सपाटा सुरु केला.
अंबाडीच्या जंगलातील सुमारे १६ हेक्टर जंगलातील संपूर्ण सागवान व आडजातीच्या झाडांची कटाई झाली. एकेकाळी घनदाट असलेले जंगल आज उजाड झाले आहे. तोड झालेल्या झाडांचा राजगड, जलधरा येथे लिलाव केला जातो. यातून महामंडळाची रग्गड कमाई होत आहे. मात्र त्यामुळे जंगलाचे वाळवंटात रुपांतर होवू पाहत आहे़ याबाबतची तक्रार काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष किशनराव किनवटकर यांनी केली.
दरम्यान, सहा गावांच्या ग्रामपंचायतींनी अवैध वृक्षतोड बंद करण्याचा ठरावच घेतला आहे़ त्यात सावरगाव, माळकोल्हारी, तल्हारी, बेल्लोरी (धा़), जलधरा, डोंगरगाव (चि़) यांचा समावेश आहे. लवकरच अंबाडी, अंबाडी तांडा दोन ग्रामपंचायती ठराव घेणार आहेत. जि़प़ सदस्या कमल हुरदुखे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे विपुल प्रमाणात वनसंपदा असलेल्या या तालुक्यात वन विकास महामंडळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ या ब्रीदवाक्याच्या विरोधात वनविकासाऐवजी वनभकास करण्याचा प्रयत्न चालविल्याने ही वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली आहे़
वनविकास महामंडळ हटवावनविकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी व इतर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे़ झाडे लावा, झाडे जगवा या शासनाच्या पर्यावरणपुरक भूमिकेच्या विरूद्ध वनविकास महामंडळ कार्यालय काम करत आहे. येथून कार्यालय हटवावे- किशनराव किनवटकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल
नियोजनाप्रमाणे आहे सर्वमॅनेजमेंटप्रमाणे आम्ही कामे करतो. आता तेथे आम्ही रोपवनाचे काम हाती घेणार आहोत. सुरु असलेली तोड मुख्य नियोजनाप्रमाणेच आहे- आ.मे. माहोरे, विभागीय व्यवस्थापक, वनविकास महामंडळ