लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : येथे आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र निर्मितीचा असताना या केंद्राचा कार्यभार पाहण्यासाठी सनियंत्रण समिती, समन्वयक व दोन सहसमन्वयकांच्या केलेल्या नियुक्तीत एकाही आदिवासी समाजाचा प्रतिनिधी नसल्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या केंद्रासाठी एकही मूळ आदिवासी समाजाचा प्रतिनिधी नसून सल्लागार समितीतसुद्धा आदिवासींना प्रतिनिधित्व नाही़ त्यामुळे या केंद्राच्या उद्देशाबद्दलच शंका घेत आदिवासी समाजावर झालेला हा अन्याय आहे़ आदिवासी समाजाचा अभ्यास व संस्कृतीचे संवर्धन व्हावे, ही भूमिका केंद्र सुरू करताना स्व़ खा़ माजी मंत्री उत्तमराव राठोड व तत्कालीन कुलगुरू जनार्दन वाघमारे यांची होती़ज्या समाजाच्या विकासासाठी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे, त्या समाजाचे प्रतिनिधी व ज्येष्ठ समाज कार्यकर्त्यांना डावलणे म्हणजे उद्देश सफल होणार नाही, असेही निवेदनात म्हटले. त्यांची संस्कृती, चालीरीती, बोलीभाषा, परंपरा व भविष्यातील विकासासाठी काम केले पाहिजे, ते गैरआदिवासींना समजणार नाही व बिगरआदिवासी संचालक मंडळ व शिक्षक कर्मचारी आदिवासींना न्याय देतील यावर विश्वास कसा ठेवावा, अशी शंका व्यक्त करत कै़उत्तमराव राठोड आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्रासाठी केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करून नव्याने करण्याची मागणी सिडाम यांनी निवेदनाद्वारे केली आहे़---स्वारातीम विद्यापीठ नांदेड संचलित किनवट येथे कै़ उत्तमराव राठोड आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे़ या केंद्राची इमारत बांधून पूर्ण करण्यात आली असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्राचा कारभार पाहण्यासाठी सहनियंत्रण समिती, समन्वयक, दोन सह समन्वयकांची नियुक्ती केल्याचे सिडाम यांनी म्हटले.
आदिवासी संशोधन केंद्राच्या नियुक्तीत आदिवासींनाच डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:41 AM