माहूर (जि.नांदेड) : तालुक्यातील वाईबाजार कोलामखेड हे आदिवासी पोड असून, या गावातील एकाही नागरिकाने अद्यापपर्यंत लस घेतलेली नाही. आदिवासी बांधवांचा लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. लस घेतल्यास जिवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने जर बाँडपेपरवर लिहून दिले तरच लस घेणार, असा पावित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.
लसीकरणाची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. शहरी भागात लस मिळत नसल्याची ओरड आहे, तर ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर अल्पप्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील बहुसंख्येने असलेला आदिवासी समाज लसीकरणापासून दूरच आहे. आदिवासी बांधवांचा गैरसमज दूर करण्यासाठी सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गावात जावून आदिवासी बांधवांचे मन वळविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला यश आले नाही. आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी २२ पोडावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविली. आदिवासी बांधवांचे मन वळविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोविडची लस घेतल्यास आपल्याला इतर आजार होतील, लस घेतल्यानंतर जीव जाईल अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण आदिवासी भागात आजही लसीकरणाची टक्केवारी अत्यल्प आहे. गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी आदिवासी भीमपूर गावात आदिवासी बांधवांचे मन वळविण्यात यश मिळविले. त्यानंतर ५३ आदिवासी बांधवांनी लसीकरण करून घेतले. मात्र दुसऱ्या फेरीत लसीकरणासाठी एकही आदिवासी बांधव समोर आला नाही. माहूर तालुक्यातील वाईबाजार जवळील कोलामखेड मदरसा येथे २८४ लोकसंख्या असून, गोंडखेडी येथे २२४ असे एकूण ५०८ नागरिकांपैकी केवळ आशा वर्कर छाया हुसेन दुमणे यांनीच एकमेव लस घेतली आहे.
चौकट .........
माहूर तालुक्यात १ लाख ९ हजार ४९२ लोकसंख्येपैकी २६ हजार ६३२ नागरिकांनीच लस घेतली आहे. यापैकी पहिली लस २० हजार ३९३ नागरिकांनी, तर दुसरी लस ६ हजार २३९ नागरिकांनी घेतली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी लस न घेण्यामागचे कारण शोधले असता जिवाचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोण घेणार, बाँड पेपरवर तसे लिहून देत असाल तरच आम्ही लस घेऊ, असे नागरिकांनी सांगितले.