जागतिक महिला दिन
मुदखेड : येथील राजीव गांधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रमेश कदम होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
मोतेवार यांना पुरस्कार
मुखेड : तालुक्यातील आंबुलगा (बु.) येथील सहशिक्षक रमाकांत मोतेवार यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी दरड तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा.सुधीर सावंत, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव उपस्थित होते.
रोहयो कामांचा शुभारंभ
मुखेड : आंबुलगा बु. येथील ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी रोहयो योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ गुलाजी रॅपनवाड व उपसरपंच शरद पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी शंकर कल्याणकर, नीलेश नागमवाड, बळी कांबळे, राजू कांबळे, विठ्ठल कल्याणकर, रमेश देशटवार आदी उपस्थित होते.
बाजार समितीवर केकाटे
कंधार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांची नियुक्ती झाली. माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
स्काॅर्पिओच्या धडकेत मृत्यू
भोकर : तालुक्यातील मेंडका शिवारात वेगातील स्कॉर्पिओच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना ६ मार्च रोजी सायंकाळी घडली. सत्यपाल रघुनाथ पवार असे मयताचे नाव आहे. एम.एच.२१-व्ही.२२७४ या स्कॉर्पिओने त्यांना धडक दिली. भोकर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
अर्धापूर : शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरच्या रासेयो विभाग व महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा सुरनर व डॉ.एल.जी.चंदनकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.के. पाटील होते. यावेळी डॉ.स्वाती मदनवाड, डॉ.सारिका औरादकर, डॉ.कविता केंद्रे, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ.प्रमिला लोकरे, कुंता राऊत आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.सीमा सुरनर व डॉ.एल.जी. चंदनकर यांनी विद्यार्थिनींची तपासणी केली. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.रघुनाथ शेटे यांनी केले.
आष्टूरकर रुजू
धर्माबाद : येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरच्या सहायक अधीक्षक पदी एस.बी. आष्टूरकर यांनी पदभार स्वीकारला. न्यायालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी ते उमरी येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते.
लसीकरणाचे उद्घाटन
कुंडलवाडी : येथील आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्यात आली. माजी आ.गंगाराम ठक्करवाड, जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, नगराध्यक्ष सुरेखा जिठ्ठावार यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती.
दोघे किरकोळ जखमी
धर्माबाद : येथील रेल्वे गेट क्रमांक २ ते बाभळी फाटा या राज्य रस्त्यावर कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात बाभळी येथील पंडित कदम व बाबाराव कदम हे दुचाकीवरील दोघे जखमी झाले. कारमध्ये चालकासह चार प्रवासी होते. पाचही जणांना इजा झाली नाही. जखमी दोघांच्या पायाचे फॅक्चर झाल्याची माहिती डॉ.पंडित यांनी दिली.
पानशेवडीत आग
पानशेवडी : पानशेवडी व तळ्याची वाडी परिसरात धाकूतांडा, खेमातांडा, रामातांडासह परिसरातील सात ते आठ तांडा परिसरातील २ हजार ५०० हेक्टर जळून खाक झाले. या आगीत कडबाही जळाला. पशुप्राण्यांचाही मृत्यू झाला. अवजारेही जळून खाक झाले.