नांदेड - नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. नागरिकांच्या आंदोलनामुळे तीन तासांपासून हा मार्ग ठप्प झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा बाभळीची झाडे वाढली आहेत. या झाडाच्या फांद्या रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नांदेडमधील ट्रक (एम एच 26, ए डी 1918) हैद्राबादकडे जात होता. त्यावेळी हैद्राबाद येथून निघालेला कंटेनर (यूपी 72, टी 2025) नागपूरला जात होते. यावेळी बोणडरजवळ वळणावर झाडांच्या फांद्यामुळे अंदाज न आल्याने या दोन्ही वाहनांची धडक झाली. यात 4 जण जखमी झाले.
जखमींना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यामुळे तीन तासांपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. (व्हिडीओ - सचिन मोहिते)