नांदेड : अवैध वाळू उपसा करीत असलेल्या एका जेसीबीला पकडण्यासाठी नायब तहसीलदारांसह दोन तलाठ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. मात्र जेसीबी चालकाने धोकादायक व जीवघेण्या पद्धतीने जेसीबी चालवून पळ काढला. जवळपास ८ ते १० किलोमीटरच्या पाठलागादरम्यान जेसीबी चालकाने नायब तहसीलदारांसह तलाठ्यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथे जप्त केलेल्या रेतीसाठ्यातून जेसीबी मशिनने हायवा ट्रक भरत असल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांना मिळाली. यावेळी अंबेकर यांनी नायब तहसीलदार एम.एम. काकडे यांच्यासह तलाठी सय्यद मोहसीन यांना एम.एच.२६ एडी २६११ या शासकीय वाहनाने गंगाबेट येथे पाठविले. हे अधिकारी तेथे पोहोचत असतानाच पिवळ्या रंगाची जेसीबी मशीन विरुद्ध दिशेने येताना दिसली. भरधाव वेगातील या मशीनने येतानाच सदर शासकीय वाहनास उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतली. त्यानंतर त्याचा पाठलाग केला. बेटसांगवी ते शेवडी रस्त्याने या जेसीबीचा पाठलाग केला असता सदर जेसीबी चालकाने नागमोडी वळणे घेत जेसीबी चालवली. तलाठी सय्यद मोहसीन यांनी जेसीबीला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मोटारसायकलवरही चालकाने जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. सदर जेसीबी चालकाचे नाव तुकाराम कदम (रा. शेलगाव ता. लोहा) असे आहे. त्याच्याविरुद्ध नायब तहसीलदार काकडे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण अंबेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
दोन दिवसांत १७ लाखांचा दंड वसूलनांदेड तहसील कार्यालयाने दोन दिवसात १७ लाख रुपयांचा दंड अवैध वाळू वाहतूक प्रकरणी वसूल केला आहे. ५ जुलैच्या रात्री सिद्धनाथ रेती घाटावर एक जेसीबी नदी पात्रातून अनधिकृतपणे उपसा करीत होते. सदर जेसीबी जप्त करुन ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे तर गंगाबेट येथील पळून गेलेल्या जेसीबी मालकाकडूनही ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर गंगाबेट येथेच सापडलेल्या हायवा वाहनाला दोन लाख रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती तहसीलदार अंबेकर यांनी दिली.
जेसीबीसह चालक झाला फरारशेवडी गावाजवळ जेसीबी आली असता चौकामध्ये लहान मुले व गावकऱ्यांची गर्दी होती. यावेळी नायब तहसीलदार काकडे यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून या जेसीबीचा पाठलाग थांबवला. प्रारंभी जप्त केलेल्या रेती साठ्यावरुन हायवा क्र. एम.एच.२६- बी-४३०० व जेसीबीला रहाटी सज्जाचे तलाठी मंगेश वांगीकर यांनी अडवून ठेवले होते. मात्र जेसीबी चालकाने जेसीबीची लोखंडी बकेट फिरवत तेथून जेसीबी मशीन घेऊन पळ काढला. हायवा ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.