शेतातील सागवानाची झाडे चोरीला
किनवट तालुक्यातील मौजे दहेगाव येथे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण ज्ञानोबा केंद्रे यांच्या शेतातील २५ हजार रुपये किमतीची दोन सागवानांची झाडे चोरट्याने लांबविली. ही घटना ५ मे रोजी घडली. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची जनावरे केली लंपास
नायगाव तालुक्यात मौजे मांजरमवाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळ सोडलेली चार जनावरे चोरट्याने लांबविली. ही घटना ६ मे रोजी घडली. खाकू व्यंकटी आलगुडवाड यांनी दोन गायी आणि दोन गोऱ्हे गावात चरण्यासाठी सोडले होते. ५० हजार रुपये किमतीची ही जनावरे परस्पर नेण्यात आली. या प्रकरणात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतीच्या वादातून कत्तीने केला हल्ला
लोहा तालुक्यातील मौजे टाकळगाव शिवारात शेतीच्या वादातून हल्ला करण्यात आला. ही घटना २८ एप्रिल रोजी घडली. आनंदा मारोती लामदाडे हे शेतात असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी शेतीची वाटणी का करून देत नाही असे म्हणून लामदाडे आणि अन्य एकाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ऊस तोडण्याच्या कत्तीने वार करण्यात आला. या प्रकरणात सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वन विभागाच्या कार्यालयात धुडगूस
हदगाव येथील वन विभागाच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत आरोपीने धुडगूस घातला. ही घटना ५ मे रोजी घडली. या प्रकरणात हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्याच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे हदगाव येथील वन विभागाच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून या ठिकाणी तक्रारीसाठी बॉक्स ठेवण्यात आला होता. ५ मे रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आदित्य पाटील शिरफुले हा आला. यावेळी गेटवरील शांताबाई आराळे यांनी तुमची काय तक्रार आहे ती पेटीत टाका असे सांगितले. परंतु शिरफुले हा जबरदस्तीने वनपालांच्या कक्षात घुसला. या ठिकाणी वृक्षारोपणाचे काम का देत नाही म्हणून त्याने कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी एका कर्मचाऱ्याने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता, त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वनपाल शरयू सुरेशराव रुद्रवार यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.