कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. मागील वर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. दरम्यान, मार्च, एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. जिल्ह्यात ३२ हजार १८५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले हाेते. या विद्यार्थ्यांनी कला शाखेसाठी ४३० रुपये, विज्ञान शाखेसाठी ४५५ रुपये शुल्क भरले आहे. सरासरी ४४० रुपये गृहित धरले, तर ३२ हजार १८५ विद्यार्थ्यांनी १ कोटी ४१ लाख ६१ हजार ४०० रुपये परीक्षा शुल्क भरले आहे.
चौकट- कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यातच मागील वर्षभर शाळा बंदच होत्या. त्यामुळे भरलेले शुल्क परत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळावे, हे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.
- अभिजीत गालफाडे, विद्यार्थी.
चौकट- बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील ३२ हजार १८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही सूचना मिळाली नाही.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड.