नांदेड : लग्न समारंभातील वाढता खर्च ही बाब चिंतेचा विषय असली तरी श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत मात्र नवरा नवरीचे कपडे हे केवळ सव्वाशे रूपयात उपलब्ध होत आहेत. गरीबाच्या संसाराला जुन्या कपड्यांची झालर असली तरी त्यांच्या आनंदाचे मोल मात्र हे पैशात मोजता येणारे नाही.
माळेगाव यात्रा ही हौश्या, गौश्या व नवश्यांची समजली जाते. या यात्रेत जुन्या कपड्यांचा मोठा बाजार येथे भरतो. या यात्रेत अकोला, निजामाबाद, म्हैसा, नांदेड , लातूर, मुंबई आदी जिल्ह्यामधून जवळपास अडीचशे जुन्या कपड्यांचे दुकाने थाटली आहेत.
६0 रुपयांत नवरी.. ६0 रुपयांत नवरदेव अशी घोषणा देऊन ग्राहकांचे लक्ष व्यापारी वेधून घेत आहेत. अनेक गरीब, भटक्या जातीतील वधुवरांचे लग्न या यात्रेत होत असतात. या गरिबांच्या संसाराला जुन्या कपड्यांची झालर मोठय़ा दिमाखदारपणे लावण्यात येते. येथे लग्न जमतात, जुन्या कपड्यांची खरेदी होते आणि त्यानंतर संसाराचा गाडा सुरू होतो.
दारोदार हिंडून भांडे विकून त्याबदल.यात जुन्या साड्या व जुनी कपडे घेऊन त्या कपड्यांना स्वच्छ धुतल्यानंतर या बाजारात विक्रीसाठी आणले जाते. उदगीर येथील व्यापारी रामचंद्र केरबा धुर्वे हे गेल्या ५0 वर्षापासून या माळेगाव यात्रेत जुनी कपड्यांची विक्री करण्यासाठी येत आहेत. ते म्हणाले की, अनेकांच्या दारोदारी फिरुन जुनी कपडे आम्ही गोळा करतो याच कपड्यातून गरिबांचा संसार फुलविण्यात आम्हाला आनंद मिळतो. या व्यापारातून पैसे जरी कमी मिळत असले तरी कपडे खरेदी करणार्या व्यक्तींचा आनंद पाहून आम्हाला उत्साह मिळतो. /(प्रतिनिधी)