नांदेड- जगभरात सध्या कोरोना लसीकरणाची तयारी सुरु आहे. त्यातच देशात सिरम इन्स्टीट्यूटने लस तयार केली आहे. परंतु या लसीच्या नावावरुन नांदेडच्या क्युटीस बायोटेक कंपनीने दावा केला आहे. क्युटीसने कोव्हिडशिल्ड आणि कोविशिल्ड हा ट्रेडमार्क आमचा असून त्याचा इतर कुणी वापर करु नये अशा प्रकारचा दावा नांदेड न्यायालयात दाखल केला आहे.
याबाबतची सुनावणी येत्या १८ डिसेंबर रोजी होणार आहे.याबाबत क्युटीस बायोटेकच्या अर्चना काबरा यांच्या वतीने ॲड.मिलिंद एकताटे यांनी हा दावा दाखल केला आहे. त्याबाबत ॲड.एकताटे म्हणाले, क्युटीस बायोटेक कंपनीने २० एप्रिल २०२० रोजी कोविशिल्ड या नावाने सॅनिटायझरसाठी ट्रेडमार्ककडे नोंदणी केली होती. परंतु प्रतिवादी सिरम इन्स्टीट्यूट आणि फार्मासिटीकल कंपनीचे भंडारु श्रीनिवास यांनी कोविशिल्ड आणि कोव्हीडशिल्ड हे नाव वापरले. अशाप्रकारे आमची या नावाची ट्रेडमार्ककडे नोंदणी असताना केलेल्या नावावर आक्षेप होता. त्यामुळे क्युटीसने कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यातील सॅनिटायझरच्या मागणीवर परिणाम होवून नुकसान होणे स्वाभाविक होते. त्यामुळे हा ट्रेडमार्क आमचा असल्याबाबत आम्ही न्यायालयात दावा दाखल केला आहे.याबाबत आता १८ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचेही ॲड.एकताटे म्हणाले.