धर्माबाद (जि. नांदेड) : येथून दोन कि़ मी़ अंतरावर असलेल्या बाळापूर शिवारातील तलावात दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली़ हे दोन्ही विद्यार्थी नायगाव (ध) येथील असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे़
बाळापूर येथील गुरुकुल विद्यालयातील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेले लखन सिद्धप्पा राचेवाड व साईचरण किशन आलूरोड हे दोघे सकाळी सव्वाअकरा वाजता शाळेची मधली सुटी झाल्यानंतर शिक्षकांची नजर चुकवून बाहेर पडले आणि तलावात पोहण्यासाठी गेले़ पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व तलावात प्रचंड गाळ साचलेला असल्याने चिखलात रुतून या दोघांचाही मृत्यू झाला़
लखन व साईचरण हे धर्माबाद येथील राष्ट्रमाता जिजाऊ मुलांच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते़ घटनेची माहिती कळताच धर्माबाद ठाण्याचे पोनि. सोहन माछरे, पोऊनि. सनगले तसेच पोलीस जमादार स्वामी व इतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले़ मुलांचे मृतदेह पाहून दोन्ही विद्यार्थ्यांच्या आईवडील तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला़ या घटनेबाबत गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक मनमोहन कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेच्या मध्यंतरात नजर चुकवून हे विद्यार्थी शाळेबाहेर गेल्याचे सांगितले.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यातविद्यार्थ्यांच्या मृत्यूला शाळा जबाबदार असल्याचा आरोप करीत मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी रात्री ११ पर्यंत मृतदेह ताब्यात घेतले नव्हते. शाळेसाठी ४० हजार रुपये शुल्क भरतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे काम शाळेचे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतले.