नांदेड: वीजबिलाच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीजबिल भरलेले नाही, अशा कृषी पंप वीजग्राहकांना जागेवरच वीजबिल दुरुस्त करुन देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरणच्या वतीने वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा १ व २ जानेवारी असा दोन दिवस असेल.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार वीजबिल दुरुस्ती मेळावे घेण्याचा महावितरणने निर्णय घेतला आहे़ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी १ व २ जानेवारीला महावितरणच्या कार्यालयात वीजबिल दुरुस्तीची सोय करण्यात आली आहे़ ज्या-ज्या कृषीपंप ग्राहकांना वीजबिलाबाबत तक्रारी असतील अशा कृषीपंपधारक शेतकर्यांनी शेवटचे वीजबिल भरल्याची पावती सोबत घेवून मेळाव्यास हजर रहावे. सर्व बिले तपासून जागेवरच त्वरित सुधारित बिबील देण्यात येणार आहे़ हे दुरुस्ती केलेले बिल वीजग्राहकांना ताबडतोब भरता यावे यासाठी वीजबिल जमा करुन घेण्याचीही व्यवस्था या मेळाव्यात करण्यात आलेली आहे़ त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे़
वीजबिल भरल्याशिवाय कोणत्याही कृषीपंपधारक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्वरत जोडला जाणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी या मेळाव्याचा फायदा घेत आपल्या वीजबिलाची दुरुस्ती करुन घेवून वीजबिलाचा तत्काळ भरणा करावा, असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे आणि अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे यांनी केले आहे.