लोकमत न्यूज नेटवर्क, अर्धापूर/नरसी (जि. नांदेड) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. हदगाव तालुक्यात एका २४ वर्षीय तरुणाने, तर नायगाव तालुक्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
हदगाव तालुक्यातील वडगाव येथील शुभम सदाशिव पवार (२४) या तरुणाने विषारी द्रव घेऊन आत्महत्या केली. ‘मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे.’, अशी चिठ्ठी त्याच्याजवळ आढळली. नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील ओमकार आनंदराव बावणे या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आई-वडील मोलमजुरी करून आम्हाला शिकवत होते; त्यांची परिस्थिती पाहवत नव्हती, असे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
‘हात जोडतो बाबांनो, आत्महत्या करू नका’
रविवारी पहाटे हदगाव तालुक्यातील वडगावच्या शुभम पवार या तरुणाने, ‘मराठा आरक्षणासाठी दिलेले बलिदान वाया जाऊ देऊ नका’, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मयत शुभमचे वडील सदाशिव पवार यांनी आरक्षण मिळेल; परंतु हात जोडतो बाबांनो आत्महत्या करू नका, असे भावनिक आवाहन मराठा तरुणांना केले आहे. शुभम तर आता गेला; परंतु माझी मुलगी बारावीला आहे. तिला शासकीय नोकरी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गळफास घेण्याआधीच रोखली आत्महत्या
गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील ठाकरआडगाव येथे ६० वर्षीय व्यक्तीने शेतातील झाडाला गळफास घेतला. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला खाली उतरविले आणि बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीने ‘मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मी आपला जीव देत आहे’, अशी चिठी लिहून ठेवली होती.
मारोती उत्तमराव आनंदे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास ते स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न करीत होते. आजुबाजुला असलेल्या शेतकऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेत आनंदे यांच्या गळ्यातील फास सोडून आत्महत्येपासून रोखले. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.