एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:35 PM2024-11-06T13:35:06+5:302024-11-06T13:38:25+5:30
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील.
- रामेश्वर काकडे
नांदेड : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या एकाच मतदारसंघात दोन प्रयोग होत असून, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि उद्धवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची गुंतागुंत झालेल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
उत्तर मतदारसंघात शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर विरुद्ध काँग्रेसचे अब्दुल सत्तार असा थेट सामना होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्ष या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने शिंदेसेनेच्या उमेदवाराला उद्धवसेनेच्या उमेदवार संगीता डक आणि काँग्रेसचा उमेदवार कसा शह देणार, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात नऊपैकी सात विधानसभा मतदारसंघांत आघाडीतून काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना, तसेच काँग्रेस विरुद्ध भाजप, अशीच अनेक ठिकाणी लढत होईल. असे असले, तरी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील.
आघाडीतील घटक पक्षच आमने-सामने
जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत तिकीट न मिळाल्याने भाजप आणि शिंदेसेनेत बंडखोरी झालेली आहे. नांदेड उत्तर, लोहा मतदारसंघ वगळता इतर सात मतदारसंघांत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असाच सामना रंगणार आहे. पण, नांदेड उत्तरमध्ये आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि उद्धवसेना आमने-सामने आहेत. तसेच लोहा मतदारसंघातदेखील उद्धवसेना आणि घटक पक्ष असलेल्या शेकापचाही उमेदवार रिंगणात आहे.